Thank God बाप्पा आपल्या सारखा नसतो...

श्रीगणेश आगमनाच्या मिरवणुकीत "तुझ्या रुपाचं चांदणं पडलंय....." हे गाणं ऐकलं अन क्षणभर विचार आला की खरंच हि गणेशाची मिरवणूक आहे का????
पुढच्या चौकात तर कहरच झाला "Email काल internet वर केला...." ची बंदिश लागली होती (बंदीशच म्हणावी लागेल अशी ही लावणी)
नंतर एका ठिकाणी पाहिलं तर श्रीगणेशासमोरच काही जणांनी पत्त्यांचा आखाडा टाकला होता...मला मान्य आहे की गणेशोत्सव हि संकल्पना लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरु झाली. आता ती सुरुवात भाऊ रंगारी नी कि टिळकांनी सुरु केली त्या वादात नाही पडायचं त्याच्या मागचा उद्देश चांगला होता हे महत्त्वाचं. पण आजकाल गणेशोत्सवाच्या नावाखाली आम्ही पत्त्यांचे फडचं जर भरवत असू तर त्या संकल्पनेला काहीच अर्थ राहणार नाही..
काळानुसार गणेशोत्सवाचे रूप बदलत गेलं...
अनेक मंडळांच्या स्थापनेमुळे गणेशोत्सवाकडे उत्सव नाही तर  जणू काही स्पर्धा म्हणूनच पाहिलं जाऊ लागलंय..

मग त्या स्पर्धा श्रीगणेशाच्या मूर्तीच्या उंचीवरून (अमुक मंडळाचा इतका फूट तर तमुक मंडळाचा इतका फूट) तर कधी मंडळाच्या गणेशाच्या दर्शनाला होणाऱ्या गर्दीवरून...

सेलेब्रेटीज पासून ते गल्लीतल्या राजकीय पुढाऱ्यांची हजेरी महत्वाची वाटायला लागलीय....
६४ कला आणि १४ विद्यांचा अधिपती असणाऱ्या श्रीगणेशाला ह्या सेलेब्रेटीजची गरज आहे का हो खरंच?? मग ह्यांची गरज कोणाला त्या त्या मंडळात असणाऱ्या पुढाऱ्यांना बरोबर ना..

काळानुसार बदल होणं हा निसर्गाचा नियम आहे परंतु काळानुसार एखाद्या संकल्पनेचा उद्देशच विसरून त्यात होणारा बदल हा न पटणारा आहे...

पूर्वीच्या काळात (१० - १५ वर्षपूर्वी ह्या कालावधी ला काळ म्हणतोय कारण तेव्हा Facebook Whatsapp नव्हतं ना) गावागावातील स्थानिक कलाकारांना गणेशोत्सव हे एक महत्वाचे साधन होत  त्यांची कला सादर करण्यासाठी  परंतु आजकाल कुठेच नाटक सादर होताना दिसत नाहींत (आता मंडळांच्या नावाखाली बाकीची नाटकं होतात हा भाग वेगळा )

श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत होणारा धांगडधिंगा हा काही वेगळं नाहीये.. डॉल्बीच्या आवाजावर थरकणारी तरुणाई पाहिली की वाटतं खरंच ह्या साठी गणेशोत्सव सुरु झाला होता का???
काळ बदलतोय तसे विचार हि बदलतायत काही मंडळांनी आपली परंपरा जपून ठेवलीयच कि त्यांना ना मूर्ती उंची महत्वाची ना, मंडळात होणारी गर्दी महत्वाची  अन विसर्जन मिरवणूक देखील साध्या पद्धतीने  अशी ही  अनेक मंडळ आहेतच कि ज्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा.
गणेशोत्सवाच्या काळात अनेक उपक्रम राबवले जाऊ शकतात. रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छ भारत अभियान परंतु आजकाल हे उपक्रम एखाद्या नेत्याच्या वाढदिवसालाच साजरे झालेले पहायला मिळतात ...गोष्ट चांगलीच आहे निदान त्या निमित्ताने आपली सामाजिक बांधिलकी आपण नाही ना विसरलो ह्याची जाणीव तरी होते...

अमुक मंडळाचा गणपती नवसाला पावतो म्हणून लाखो रुपयांच दान त्या दानपेटीत टाकणारे दानशूर खरंच एखाद्या अनाथाश्रमाच्या  मदतीला धावून जात असतील कि नाही ते माहित नाही पण बाप्पा मात्र नक्की धावून जात असेल कारण ते देखीलत्याचे भक्त आहेत... बुद्धीची देवता असणाऱ्या श्रीगणेशाच्या गणेशोत्सवात परिस्तिथीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना आपण मदत करतो.Thank God बाप्पा आपल्या सारखा नसतो.
काही शहराच्या मध्यवर्ती चौकात 3- 4 गणेश मंडळ उभारलेली असतात. एकीकडे "एक गावं एक गणपती " ह्या उपक्रमात अनेक ग्रामीण गावानी आपला आदर्श उभारला आहे मग शहरांनी मागे रहावं..

प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीने पर्यावरणाचा होणारा ऱ्हास माहित असून देखील मातीच्या मूर्ती न घेण्याचा विचार न करणारे एव्हडे आम्ही सुशिक्षित मग आणखी जास्त काही लिहू.म्हणूनच म्हंटल ना "Thank God बाप्पा आपल्या सारखा नसतो".
-------------------------------------------------------
शब्दांकन : ऋषिकेश सुदर्शन शिंदे
पंढरपूर
Email:rushikeshshinde1012@gmail. com

Comments